या वर्षी शहीद दिनी (३० जानेवारी) महात्मा गांधींना आठवताना आपल्याला जाणीव आहे की गांधीजींच्या मूल्यांना आणि त्यांच्या वारश्याला कमजोर करण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत. सांप्रदायिक शक्तींचा प्रोपगंडा दिवसेंदिवस तीव्र होत आहे आणि समाजाचे विभाजन अधिकाधिक गहिरे होत चालले आहे. हिंदू मुस्लिम एकता हा गांधीजींच्या जीवनाचा मूलमंत्र होता. या महामानवाच्या या मिशनला आत्ताच्या राजकारणाने अतिशय नुकसान पोहोचवले आहे. आपण हे विसरू शकत नाही की गांधीजींच्या छातीला तीन गोळ्यांनी छिन्नविछिन्न करणारा व्यक्ती हा कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा समर्थक होता आणि ही विचारधारा राष्ट्रीय आंदोलनाच्या विचारधारेच्या विपरीत होती. राष्ट्रीय आंदोलन हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या विचाराने भारलेले होते. मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या सांप्रदायिक शक्ती तर पाकिस्तानाची निर्मिती झाल्यावर क्षीण झाल्या पण हिंदू सांप्रदायिक शक्तींनी हळूहळू स्वत:ला मजबूत करायला सुरुवात केली. जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या आंदोलनात जोडले जाण्यापूर्वी या शक्तींना समाजात सन्मानाने बघितलं जात नव्हतं पण या आंदोलनाचा हिस्सा बनल्यानंतर यांची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा अधिक सशक्त व्हायला लागली. गांधीजींची सर्व जगात उजळ आणि निर्दोष प्रतिमा होती त्या मुळे भाजप – आरएसएस ना सुद्धा त्यांच्याप्रति सन्मान भाव दाखवावा लागला. पण हा सर्व दिखावा होता. प्रत्यक्षात त्यांच्या शाखांमधून आणि अन्य मंचांमार्फत त्यांनी गांधीजीं विरुद्ध अनेक अपभ्रंश पसरवले; जसे की, हिंदूंच्या हिताचा बळी देऊन मुस्लिमांच्या हिताला जास्त महत्त्व देत त्यांनी हिंदू समाजाला असहाय बनवले, भगत सिंगचे प्राण वाचवले नाहीत, महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांना दुर्लक्षित केले आणि सरदार पटेल यांच्यासारख्या सक्षम व्यक्तीला बाजूला सारून नेहरूंना आपला उत्तराधिकारी नेमून पंतप्रधान केले; आणि गांधीजींना दोषी ठरवण्याचे प्रयत्न केले. सुरुवातीला तोंडी प्रचार आणि नंतर विविध माध्यमांमार्फत समाजात गांधींजींबद्दल चुकीची मते तयार कारणे आणि त्याच बरोबर गांधीजींचा खुनी नथुराम गोडसेचा महिमा वाढवण्याचे काम करण्यात यशस्वी झाले. एवढंच नाही तर गांधीजींच्या हत्येच्या प्रसंगाचं सार्वजनिक प्रदर्शन पण आयोजित केले गेले. गांधीजींना कमी आणि गोडसेला महान दाखवणारी नाटके आणि सिनेमे निर्माण करुन प्रदर्शित केले गेले. या वरून हे स्पष्ट होतं की गांधीजीं प्रति किती द्वेष निर्माण केला गेला आहे. गांधीजींच्या विरुद्ध करण्यात येत असलेल्या दुष्प्रचारामागे हिंदुत्ववादी शक्तींचा सर्वात जास्त हात आहे. त्यांचा हेतू स्वत:ला मजबूत करणे आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या मूल्यांना विरोध करणे जी स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानात प्रतिबिंबीत झाली आहेत. तुर्कस्थानात १९१९ साली खिलाफतच्या पुनर्स्थापनेसाठी मुसलमानांचे विश्वव्यापी आंदोलन सुरू झालं. भारतीय मुसलमानांना ब्रिटीश वसाहतवादी सरकारविरुद्ध चाललेल्या लढ्यात जोडून घेण्याची ही चांगली संधी होती, तिचा उपयोग करून गांधीजींनी स्वातंत्र्यता संग्रामला व्यापक स्वरूप देण्याचे लक्ष्य बऱ्यापैकी पूर्ण केलं. या वेळी समांतर चाललेली असहकार चळवळ इंग्रजांविरुद्ध असा पहिला संघर्ष होता ज्यात सामान्य जनता मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. या आधी बंगालच्या विभाजना विरुद्ध व्यापक जन आंदोलन झाले होते. असहकार आंदोलनाने चांगलाच जोर पकडला होता पण दुर्भाग्याने चौरीचौरा हत्याकांड झाले आणि हे आंदोलन स्थगित करावे लागले. दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह १२ मार्च १९३० रोजी सुरू झाला आणि त्याच बरोबर सविनय कायदेभंगाची चळवळही जोरात सुरू झाली. मिठाचा सत्याग्रह एप्रिल महिन्यात समाप्त झाला पण सविनय कायदेभंगाची चळवळ १९३४ पर्यंत चालू राहिली. या वेळेसच भगत सिंह, सुखदेव, राजगुरू फाशीच्या शिक्षेला तोंड देत होते. या बद्दल खोटं पसरवलं जातंय की गांधीजी ही शिक्षा थांबवू शकत होते. लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की, आता जे लोक हे खोटं पसरवत आहेत त्यांनी त्या वेळेस या क्रांतिकारकांच्या समर्थनार्थ एक शब्दही काढला नाही. गांधीजींनी तेव्हाचे व्हॉइसरॉय लॉर्ड अर्विन या दोनदा पत्र लिहून या तिघांना मृत्युदंड देऊ नये अशी विनंती केली होती. त्यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीतही गांधीजींनी या मुद्द्यावर चर्चा केली होती. अर्विनने या अपीलावर विचार केला परंतु ब्रिटिश सरकारने ते धुडकावून लावले कारण त्या वेळी पंजाब मध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा मृत्युदंड रद्द केल्यास राजीनामा देऊ अशी धमकी दिली होती. प्रसिद्ध इतिहासकार व्ही. एन. दत्ता पण गांधी – अर्विन यांच्या मध्ये झालेल्या पत्रव्यवहारावरून आणि समकालीन साक्ष्यांवरून याच निष्कर्षावर पोहोचले की, “ गांधीजी भगत सिंहाचे प्राण वाचवण्याबद्दल अत्यंत उत्सुक होते आणि म्हणून लॉर्ड अर्विनला भगत सिंहाला फाशी न देण्याची अपील करत होते.” दत्ताच्या मते गांधीजींची भूमिका समजायला आपल्याला, “व्हॉइसरॉयशी त्यांच्या चर्चांना त्यावेळेचे राजकीय वातावरण, लोकमताचा दबाव, व्हॉइसरॉयची भूमिका आणि ब्रिटिश नोकरशाहीची कार्यप्रणाली आणि भारत आणि ब्रिटनच्या साम्राज्यवादी तंत्राच्या संदर्भात बघायला हवं.” दुसरं खोटं जे खूप मोठ्या प्रमाणात पसरवलं जातंय ते म्हणजे गांधीजींनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या योगदानाला दुर्लक्षित केलं. खरी गोष्ट अशी आहे की नेताजींनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी कुठली पद्धत वापरावी यावर मतभेद झाल्यावर आपली प्रतिष्ठा आणि सन्मान ठेवत काँग्रेस सोडली होती. जिथे काँग्रेसचे बहुतांश नेते ब्रिटीश सरकार विरुद्ध आंदोलन करायच्या बाजूचे होते तिथे नेताजींची इच्छा होती की ब्रिटनशी सामना करायला जपान आणि जर्मनी सारख्या शक्तींची मदत घ्यावी. त्या वेळी भारतातल्या हिंदुत्ववादी शक्ती जास्तीत जास्त भारतीयांनी ब्रिटिश सैन्यात भरती व्हावे याचे अभियान चालवित होत्या. याच ब्रिटिश सैन्याने नेताजींचा आझाद हिंद फौजेच्या विरुद्ध लढाई केली होती. परस्पर मतभेद असूनही नेताजी आणि गांधीजी एकमेकांचा सन्मान करत होते. नेताजी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ म्हणत तर गांधीजी नेताजींना ‘देशभक्तांचा राजा’ म्हणून गौरवत असत. एका बैठकीत गांधीजींनी नेताजींना सांगितले की, ते नेताजी ज्या मार्गाचा आग्रह धरत आहेत त्याच्या ते ठाम विरोधात आहेत, पण जर नेताजींनी त्या मार्गावर चालून स्वातंत्र्य मिळवलं तर त्यांचं अभिनंदन करायला गांधीजी सर्वात पहिले व्यक्ती असतील. नेताजींनी आपल्या आझाद हिंद सेनेच्या पहिल्या बटालियनचे नाव गांधीजींच्या नावाने ठेवले होते. काँग्रेसने आझाद हिंद सेनेच्या लॉबिंग साठी एक समिती गठित केली होती. भूलाभाई देसाई, कैलाशनाथ काटजू आणि जवाहरलाल नेहरू या समितीचे मुख्य सदस्य होते. याच समितीने आझाद हिंद सैन्याच्या कैद झालेल्या सैनिकांच्या बाजूने ब्रिटिशांशी कायद्याची लढाई लढली. गांधीजींचे उत्तराधिकारी आणि भारताचे भावी पंतप्रधान यांच्या बद्दल बोलायचं तर गांधीजींनी १९४० च्या दशकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं की त्यांचे उत्तराधिकारी राजाजी नाहीत, पटेल नाहीत तर ते नेहरू असतील. व्यावहारिक दृष्टीने पाहिलं तर १९३७ आणि १९४६ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे नेतृत्व नेहरूंनीच केलं होतं. सरदार पटेलांनी म्हटलं होतं की या दोन्ही निवडणुकांत काँग्रेसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी नेहरूंनी कल्पने बाहेर मेहनत केली आहे. १९४६ साली मौलाना आझाद यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यावर नवा अध्यक्ष निवडताना गांधीजींनी पटेलांना अध्यक्षीय निवडणुकीच्या बाहेर राहायला सांगितले होते. गांधीजींचे सच्चे अनुयायी आणि नेहरुंचे जुने साथी म्हणून पटेलांना या बाबत तक्रार नव्हती आणि पुढे जीवनभर त्यांनी नेहरूंना साथ देत एकत्र काम केलं. दोघांमध्ये मतभेद होते पण एकमेकांशी व्यक्तिगत बातचीत आणि कॅबिनेट बैठकीत चर्चा करत मतभेद मिटवत असत. पटेल म्हणत असत की नेहरू त्यांचे छोटे भाऊ आणि नेता आहेत. गांधीजी देशाची नाडी ओळखून होते. त्यांना माहित होते की त्यांच्या नंतर देशातील सर्वात लोकप्रिय नेता जवाहरलाल नेहरूच आहेत आणि ते हे ही जाणून होते की देशातील युवा मंडळी नेहरुंना पसंत करत होती. गांधीजी विसाव्या शतकातील भारताचे महान नेता होते. ते भारत देशाला चांगल्या प्रकारे समजत होते. आज सांप्रदायिक शक्ती आपल्या देशाच्या प्रत्येक अपयशाला, कमतरतेला नेहरूंना दोषी ठरवत आहेत. गांधीजींवर सुद्धा अप्रत्यक्ष रित्या सतत हमले करत आहेत. (लेखक IIT मुंबईत शिकवत होते आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसाइटी अँड सेक्युलॅरिझम चे अध्यक्ष आहेत.) Post navigation महात्मा गांधी आणि कार्ल मार्क्स यांचे सृजनशील द्वंद्वात्मक संबंध कर्तव्य विरहित अर्थसंकल्प