एपस्टीन फाइल्स मध्ये देशाचे प्रधानमंत्री, अन्य एक मंत्री, सरकारचा लाडका कॉर्पोरेट प्रमुख असे अनेक जण अडकल्याची बातमी त्या आधी आली. त्याच सुमारास अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारात भारताचे सार्वभौमत्व आणि स्वाभिमान धुळीला मिळाला. भारताचे निवृत्त सेनाप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील, चीनसोबत सरहद्दीवर आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यावर, सरकारने दाखवलेला निर्नायकी पवित्रा अचानक चर्चेत आला. आणि हे सगळे वादग्रस्त विषय, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उफाळून आले. त्यामुळे सरकारची नाचक्की तर झालीच पण या सगळ्या मुद्द्यांवर विरोधक सरकारवर तुटून पडल्यावर, आपला नीटसा बचाव करण्यातही सरकारचे धुरंधर सपशेल अपयशी ठरले. या पार्श्वभूमीवर, राजधानीत त्यानंतर आयोजित Artificial Intelligence  – AI (‘एआय’) शिखर परिषद व प्रदर्शनामुळे वातावरण सावरण्यास सहाय्य मिळेल, असा सरकारचा होरा होता. पण इथेही त्यांचे आडाखे साफ चुकले.

गलगोटिया खाजगी विद्यापीठाने चीनमध्ये विकसित झालेला रोबो बाजारातून खरेदी करून आपल्या नावावर खपवण्याचा अश्लाघ्य प्रकार केवळ त्या विद्यापीठाच्याच नव्हे तर सरकारच्याही चांगलाच अंगलट आला आहे! शिक्षण क्षेत्रात खाजगी संस्थानांनी घातलेला गोंधळ काही नवीन नाही. मात्र इथे सदर विद्यापीठ इतर अनेक चांगल्या विद्यापीठांच्या तुलनेत आजिबात प्रभावी कामगिरी करत नसतानाही, सरकारच्या खास मर्जीतले! सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्र स्वयंसेवक संघाचे  जवळचे संधान असल्याने विविध सरकारी अनुदानांची करोडो रुपयांची त्यांच्यावर खैरात. मंत्री – संत्री यांचा तिथे सतत वावर. विद्यापीठांच्या कामगिरीनुसार क्रमवारी ठरवणार्‍या देशातील बहुतेक यंत्रणांनी या विद्यापीठाला अव्वल क्रम बहाल केलेला! आणि या सगळ्याच्या जोरावर विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारून, शिक्षणाचा मांडलेला बाजार! यात स्वतः संशोधन करून नवीन शोध लावण्यापेक्षा, जगात अन्यत्र झालेले प्रभावी काम विकत घेवून, ते आपल्या नावावर खपवण्याची चढाओढ. भ्रमाचा हा सागळाच भोपळा ‘एआय’ प्रदर्शनात त्यांनी केलेल्या खोटेपणामुळे फुटला आहे! कहर म्हणजे या लबाडीचा जराही माग न घेता भारताच्या संबंधित मंत्री महोदयांनी त्या विद्यापीठाचे चौर्य जणू आपलीच कर्तबगारी असे समजत त्याचा केलेला गवगवा! या विद्यापीठाचे सर्वेसर्वा सुनील गलगोटिया यांचे दिल्लीत वाडवडिलांनी सुरू केलेले पुस्तक विक्रीचे दुकान आहे. यातून पुढे विकसित केलेला क्रमिक पुस्तकांच्या प्रकाशनाचा व्यवसाय चांगलाच बहरला आणि मग स्वप्ने पडू लागली अजून मोठ्या बिझनेसची. यातूनच दिल्ली जवळील नॉयडा येथे या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाच्या सर्व वरिष्ठ पदांवर गलगोटिया परिवारातील स्त्री पुरुष आहेत. भाजपाने दिल्लीत काँग्रेसच्या विरोधात काढलेल्या मोर्चात गलगोटिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जबरदस्तीने आणल्याचे प्रकरण त्यावेळी गाजले होते. मोर्चाला आणलेल्या विद्यार्थ्यांना मोर्चाचे कारण ठावूक नव्हते की मोर्चाच्या बॅनरवरील घोषणा नीट वाचता येत होत्या!

संशोधनाच्या क्षेत्रातही गलगोटिया विद्यापीठाचा खोटेपणाचा आणि सत्ताधार्‍यांचे तळवे चाटण्याचा जुना लौकिक आहे! ऑगस्ट २०२० मध्ये इथल्या प्राध्यापकांनी संशोधन पत्रिकेत थाळी आणि घंटा वादनाने निर्माण झालेल्या कंपणांमुळे करोना जंतु मारले जातात या शीर्षकाचा निबंध लिहिला होता व त्यात भारताच्या प्रधानमंत्र्यांनी हे अस्त्र वापरल्याबद्दल त्यांची प्रशंसाही केली होती! २०१४ पासून विद्यमान सरकार व प्रधानमंत्री सत्तेवर आल्यापासून एकावर एक कहाण्या, सुरस चमत्काराची रचना आणि बिनधास्तपणे खोटे बोलण्याची चढाओढच सुरू आहे. गटारातून गॅस, क्लाऊड मुळे विमानवेध चुकणे असे अजब शोध खुद्द प्रधानमंत्र्यांनीच लावल्यानंतर इतर मंत्री, अधिकारी आणि बोगस विद्यापीठे मागे कशी रहाणार! अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत स्थानिक संसाधनांच्या आधारे मूलभूत संशोधन आणि प्रशिक्षण व्यवस्था उभारणारे लेह लडाख मधील  जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ञ सोनम वांगचूक खोट्या आरोपात तुरुंगात आणि गलगोटियाचे लबाड मोकाट, अशी आज स्थिती झाली आहे. हेही कमीच की काय म्हणत, स्वत:च्या छ्बीच्या अतोनात प्रेमात पाडलेल्या प्रधानमंत्र्यांनी या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे दरवाजे अनेक तास स्वत:च्या भेटीसाठी व त्यावरील स्वत:च्या छायाचित्रणासाठी बंद करून देशी विदेशी संशोधक, विद्यार्थी, नागरिक आणि उद्योजकांचे अतोनात हाल करून टाकले.   

उत्तरप्रदेश विधानसभेत या सार्‍या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आणि विरोधकांनी सदर विद्यापीठाची कसून व निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, विद्यापीठावर बंदी घालावी आदी मागण्या केल्या आहेत. सत्ताधार्‍यांच्या कनवटीला बांधून सरकारच्या मर्जीने वागणार्‍या या विद्यापीठातील एखादा प्राध्यापक किंवा एखादा प्रशासकीय अधिकारी यांचा या प्रकरणात बळी दिला जाईल आणि मूळ बदमाश पुन्हा पुन्हा अशीच बदमाशी करण्याकरिता मोकळेच रहातील. या बनावटगिरीचा प्रचार करणारे केंद्रीय मंत्रीही सही सलामत सुटतील.    

आपल्याकडचा अलिकडचा पेच आहे तो हा आहे! जागतिक स्तरावर उठून दिसायची इच्छा असणे आजिबात गैर नाही. उलट तशी महत्वाकांक्षा पुढे जाण्यासाठी आवश्यकच आहे. मात्र मोठ्या महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी खोटेपणा आणि छोटे रास्ते (short cuts) कामाचे नसतात. स्वत:चे अस्सल काम संशोधनाच्या सर्व कसोट्यांवर उतरत सिद्ध करावे लागते. पुराणातील कथा आणि दाखले कामी येत नाहीत तर आधुनिक युगात कामी येणारे तंत्रज्ञान, रचना, सिद्धान्त दाखवावे लागतात. त्यासाठी विद्यापीठाला स्वायत्तता आणि पुरेसा निधी पुरवावा लागतो. विद्यापीठीय कामात राजकीय आणि ‘संघीय’ हस्तक्षेप टाळावा लागतो. ‘एआय’ परिषदेच्या निमित्ताने जगभरातले विद्वान, संशोधक आणि यशस्वी उद्योजक दिल्लीत बोलावून आणि त्यांच्याशी हात जुळवत जबरदस्तीने ते उंचावून आपला दर्जा उंचावत नसतो. त्यासाठी नम्रपणे पण चिकाटीने, शास्त्रीय दृष्टीकोण मजबूत ठेवत काम करावे लागते. आयआयटी, आयआयएम, जेएनयू सारख्या नामांकित विद्यापीठांना खरी स्वायत्तता द्यावी लागते. साधे पूल, हायवेज, मेट्रोचे खांब बांधताना आवश्यक तंत्रकुशलता दाखवता न आल्याने अपघात मालिका चालवणार्‍या आपल्या देशात थेट ‘एआय’ आले की सगळे काम फत्ते, अशी समजूत प्रधानमंत्री आणि त्यांचे भक्तगण पसरवत आहेत. हे अत्यंत धोकादायक आहे. जगातील प्रगत देशांना आपल्याकडचा डेटा हवा आहे. त्यामुळे ते आपल्याकडे येणार. आपण आपला डेटा वापरुन आपली प्रगती साधणार की दुसर्‍यांच्या पालख्या वाहणार हा खरा प्रश्न आहे.        

‘एआय’ क्रांतीबाबत सावधानता आवश्यक

२ मे २०२३ रोजी कृत्रिमप्रज्ञेचे पितामह जॉफरी हिंटन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी गूगलचा राजीनामा दिला. राजीनामा देताना ते म्हणाले, “वातावरणबदलाच्या धोक्यापेक्षा कृत्रिमप्रज्ञा जास्त धोकादायक आहे.” त्यांच्या मते कृत्रिमप्रज्ञा किंवा ‘एआय’ मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान होऊन या ग्रहाचा ताबा घेईल. लोकांत फूट पाडून सत्ता मिळविण्यासाठी कृत्रिमप्रज्ञेचा वापर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. हे सगळे घडण्यापूर्वी लोक नोकऱ्या गमावून बसतील. त्यांनी खंत व्यक्त केली की, “जे घडणार आहे त्यावर, त्यांच्याकडे काहीही उपाय नाही”! 

सध्या देशात सर्वत्र सुरू असलेला ‘एआय’ चा बोलबाला हिंटन यांचा वरील इशारा आणि दिल्ली परिषदेतील फजितीच्या पार्श्वभूमीवर विचारात घ्यायला हवा. ‘एआय’ आपले रोजचे जगणे, विचार करणे, भावना व्यक्त करणे आदी सर्व आघाड्यांवर परिणाम करणार आहे. या संदर्भात या क्षेत्रातील तज्ञ सांगतात, “आपल्या मनात शंका निर्माण होते. मग आपण त्या शंकेकडे किंवा त्या प्रश्नाकडे अनेक अंगाने बघण्याचा प्रयत्न करतो. तो प्रश्न सुटेपर्यंत आपला हा प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे एखाद्या प्रश्नाकडे अनेक अंगांनी बघण्याची आपली विश्लेषणक्षमता वाढते. पण हे सगळे हवेच कशाला? मेंदूला कशाला त्रास द्या? ‘एआय’ वापरायचे तर तुम्हाला फक्त प्रश्न नीट विचारता आला पाहिजे. तेवढे पुरेसे आहे. बाकी चॅटजीपीटी बघून घेईल. अजून गंमत म्हणजे, चॅटजीपीटी एकच उत्तर अनेक शैलीत देऊ शकते. म्हणजे वर्गात एक प्रश्न विचारला तर सगळी मुले चॅटजीपीटीवर उत्तर शोधतील. तरीही ती पारंपरिक प्रकारची नक्कल नसेल. पुन्हा सगळी उत्तरे बरोबर असतील. थोडक्यात आपल्याला विश्लेषकबुद्धीची गरज नाही. प्रश्न निर्माण करून, डोक्याला ताण देण्याची गरज नाही. जास्त भाषा तरी का शिकावी?  प्रश्न विचारण्यापुरती आली की झाले. असे असूनही आम्ही चॅटजीपीटी वापरले तर शाळेत, कॉलेजात, मेडिकल, इंजिनीअरिंग या सगळ्यांत उत्तम गुण मिळतील”.

“माणूस नावाचा विचार करण्याची सवय असलेला मी, सजीव प्राणी, ती सवय गेल्यावर कसा असेन? हा खरा प्रश्न आहे. आज आपल्याला विचार करताना, डोक्याला त्रास देताना काही उत्तर सापडले, नवीन छोटेसे ज्ञान झाले तरी उत्तेजना निर्माण होते. खूप निखळ आनंद मिळतो. एखाद्या प्रश्नाचे नवीन पैलू कळले की तसाच आनंद होतो. यातूनच आपल्याला नवनवीन प्रश्नांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. कारण ती उत्तेजना किंवा तो निखळ आनंद दुसरे कोणी देऊ शकत नाही. हे मी कुठल्या शास्त्रज्ञाबद्दल लिहीत नाही. तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात लहानपणापासून हे घडत असते. मग हे सगळेच इतिहासजमा होणार का? नाही. मात्र ते फारच मोजक्या लोकांच्या वाट्याला येईल. ही उत्तेजना, हा निखळ आनंद सार्वत्रिक नसेल. मग भावी काळातील माणूस कसा असेल? त्याची सांस्कृतिक अभिरुची कशी असेल? तो समाजात सहज संवाद करू शकेल का? हे प्रश्न उपस्थित होतील”!  

‘एआय’ वापरामुळे डिजिटल दरी (Digital Divide) वाढू शकते. ज्यांच्याकडे इंटरनेट आणि ‘एआय’ आदींचा वापर करता याईल अशी साधने आहेत ते खूप वेगाने पुढे जातील, आणि ज्यांच्याकडे ती नाहीत ते अधिकच मागे पडतील. यामुळे समाजात नवीन प्रकारची विषमता निर्माण होऊ शकते. याचा सर्वात मोठा धोका म्हणजे वर आधीच वर्णन केल्याप्रमाणे ‘एआय’ वापराचा विचारशक्तीवर विपरीत परिणाम (Loss of Critical Thinking) होईल. जर विद्यार्थ्यांनी प्रत्येक उत्तरासाठी ‘एआय’ वर अवलंबून राहणे सुरू केले, तर त्यांची स्वतःची विचार करण्याची आणि तर्क करण्याची क्षमताच कमी होऊन जाईल! ‘एआय’आधारे मिळणार्‍या एखाद्या माहितीच्या सत्यतेचाही (Misinformation) प्रश्न निर्माण होवू शकेल. ‘एआय’ कधीकधी चुकीची माहिती (Hallucinations) देऊ शकते. विद्यार्थ्यांनी आंधळेपणाने विश्वास ठेवल्यास, चुकीचे ज्ञान समाजात पसरू शकते. ‘एआय’ च्या वाढत्या वापरामुळे मानवी संवादाचा अभाव निर्माण होईल. जास्त वेळ स्क्रीन आणि ‘एआय’ सोबत घालवल्यामुळे मुलांमधील सामाजिक कौशल्ये (Social Skills) आणि भावनिक बुद्धिमत्ता (EQ) कमी होण्याचा धोका आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘एआय’चे प्राध्यापक असणार्‍या मायकेल वुल्डरिज यांनी रॉयल सोसायटीच्या मायकल फॅराडे स्मृती व्याख्यानात ‘एआय’ च्या संभाव्य धोक्याबाबत ऊहापोह केला आहे.   ‘द गार्डीयन’च्या अलीकडच्या अंकात त्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. ते म्हणतात की, “पुरेशी शास्त्रीय तपासणी न करताच ‘एआय’ चा वापर निरनिराळ्या क्षेत्रात करण्याची जी चढाओढ सध्या सुरू आहे त्यामुळे भविष्यात या तंत्रज्ञानाकडून अशा काही भयंकर चुका घदू शकतात की त्यामुळे, या तंत्रज्ञानावरचा माणसाचा विश्वासच नष्ट होईल! बाजारात नवीन ‘एआय’ टूल्स पेश करण्यासाठी या क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांवर प्रचंड व्यावसायिक दबाव असल्याने कंपन्या आपल्या नवीन उत्पादनाच्या नेमक्या क्षमता व संभाव्य त्रुटी पूर्णपणे समजण्यापूर्वीच ग्राहकांना जिंकाण्यास उत्सुक राहाणार”. थोडक्यात एक काबिल तंत्रज्ञान उपलब्ध आहे पण ते व्यवस्थित तपासून मग वापरात आणण्याचा धीर कॉर्पोरेट कंपन्यांपाशी नाही!

यासाठी प्रा. वुल्डरिज यापूर्वी घडलेले एक उदाहरण देवून आपला मुद्दा सिद्ध करतात. १९३७ मध्ये अटलांटिक ओलांडून फेरी मारणारे २४५ मीटर लांबीचे हिंडेनबर्ग हे विमान न्यू जर्सी येथे उतरण्याच्या तयारीत होते तेव्हा त्याला आग लागली आणि त्यात ३६ कर्मचारी, प्रवासी आणि जमिनीवरील कर्मचारी ठार झाले. २००,००० घनमीटर हायड्रोजन असलेल्या एका ठिणगीमुळे ही आग लागली. वूल्ड्रिज म्हणतात, “हिंडेनबर्ग दुर्घटनेमुळे विमान जहाजांमधील जागतिक रस नष्ट झाला. तेव्हापासून ते एक मृत तंत्रज्ञान होते आणि असाच क्षण ‘एआय’साठी खरा धोका आहे,”. ‘एआय’ इतक्या असंख्य प्रणालींमध्ये अंतर्भूत आहे की, हिंडेनबर्ग सारखी एखादी मोठी दुर्घटना कोणत्याही क्षेत्राला धडकू शकते. चालक विरहित कार्स, जागतिक विमान परिवहन प्रणालीत ‘एआय’ प्रणीत हॅकिंग किंवा ‘एआय’ने एखादी बँकिंग सेवा प्रभावित करणे यासारख्या घटना या क्षेत्रात अगदी शक्य आहेत!

‘ओपन ए आय’ आणि ‘एमआयटी मीडिया लॅब’ने केलेल्या सर्वेनुसार, ‘चॅटबॉट’ व अन्य तत्सम टूल्स जास्त वापरणारे लोक एकाकी होत चालले आहेत. ते मुळात एकाकी असल्याने ‘एआय’ वर विसंबून रहात आहेत, की ‘एआय’च्या अतिवापराने ते एकाकी होत चालली आहेत, याबाबत शंका आहेत! ‘एआय’ तयार करणार्‍यांनी त्याचे प्रोग्रामिंग असे केले आहे की, जो कोणी त्यात संवाद साधेल त्याच्याशी ते सुरुवातीस सहमती दाखवेल. त्याची प्रशंसा करेल. असा साथीदार कोणाला आवडणार नाही? मात्र हे करत असताना आपण ‘एआय’लाच विचारले की त्याला माणसाच्या भावना नीट कळतात का? तर त्याचे उत्तर ‘नाही’, असे येईल. जवळच्या मित्राने, समुपदेशकाने आपल्याशी साधलेला संवाद आपल्याला समजून घेत आणि देत पुढे जात असतो. अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीला आपले केवळ हावभाव, मौन, स्पर्श वा स्वरातून आपल्या भावना ओळखता येतात. ‘एआय’ त्याबाबतीत निकामी!      

आज भारतासारख्या देशात तळातली ६०% जनता फक्त स्वतःचे उदरभरण करू शकते आणि त्याहून अधिक दुसरे काहीही करू शकत नाही. मात्र त्यांच्या श्रमातून लक्षणीय संपत्ती निर्माण होत असते. या लोकांना ‘एआय’ वा कृत्रिमप्रज्ञेमधून निर्माण होणारे फायदे मिळतील का? जिथे प्रगत तंत्रज्ञान शिकविण्यासाठी गुंतवणूक करायला हवी, तिथे आपण गोमूत्रातून अमृत मिळवायचा प्रयत्न करतोय. गर्भसंस्कारांचे प्रशिक्षण स्त्रीरोगतज्ज्ञांना देतोय आणि विद्यापीठातून फलजोतिष शिकविण्याचे अभ्यासक्रम सुरू करतोय. हे पाहिल्यावर आपल्याकडे उच्चशिक्षित तरुण मुलेमुली बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्वत:ला कसे जोडून घेतील हा प्रश्न जसा निर्माण होतो तसाच यातून खरे ज्ञान निर्माण करण्याच्या क्षमता विकसित होणार की ‘गलगोटिया’ प्रवृत्ती बोकाळणार हाही प्रश्न निर्माण होतो!

संजय मं. गो., कार्यकारी संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *