दावोस येथे हल्लीच भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी आपल्या भाषणातून सर्व मध्यम सत्ता जेव्हा आर्थिक महासत्तांच्या दहशतीखाली वावरत असताना त्यांना आश्वासित केलं की माझ्या देशासारख्या मध्यम सत्ता शक्ती हीन नाहीत तर त्यांच्यात जगाची नवीन शक्ती बनण्याची क्षमता आहे जी प्रामाणिकता, मानवाधिकार, शाश्वत विकास, सार्वभौमत्वाचा आदर अशा मूल्यांच्या पायावर संघटितपणे उभी करता येईल. सर्वांनी प्रशंसा केलेल्या त्या भाषणाचा सारांश इथे देत आहोत.

जागतिक स्तरावर भांडवलशाहीने व्यापाराच्या माध्यमातून मध्यम आणि गरीब देशांवर दडपण आणण्यासाठी अशा आर्थिक परिषदा सुरू केल्या आहेत. त्यांच्या मार्फत परकीय गुंतवणूक आणि व्यापार करार करण्यासाठी आपल्यासारख्या अनेक देशातील सरकारे आतूर असतात. अशा कोलाहलात मूल्याधिष्ठीत जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची कल्पना सांगत एक वैचारिक दिशा कॅनडाच्या पंतप्रधानांनी मांडली. त्या बाबत आंदोलनच्या वाचकांची मते जाणून घ्यायला आवडेल.

मी आज इथे जागतिक व्यवस्थेत सध्या आलेल्या एका मोठ्या व्यत्ययाबद्दल बोलणार आहे. एक सुखद कथा संपून कठोर वास्तवाची सुरुवात होते आहे, जेव्हा भू – राजकारणात, विशेषतः जगातील आत्ताच्या प्रमुख महासत्तांच्या राजकारणाला कोणत्याही मर्यादा किंवा बंधने उरलेली नाहीत. दुसरीकडे मी हे सांगू इच्छितो की इतर देश, माझ्या देशासारखे मध्यम शक्ती असलेले देश असहाय्य नाहीत. मानवाधिकारांचा आदर, शाश्वत विकास, ऐक्यभावना, सार्वभौमत्व आणि विविध राष्ट्रांची प्रादेशिक अखंडता यांसारख्या मूल्यांचा पाया असलेली नवी जागतिक व्यवस्था उभारण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

असं दिसतंय की दर दिवशी आपल्याला आठवण करून दिली जाते की आपण महासत्तांच्या शत्रुत्वाच्या  युगात जगत आहोत आणि नियमांवर आधारित असलेली जागतिक सत्ता आता संपत चालली आहे, बलवान  जे करू शकतात ते करत आहेत आणि दुर्बलांना जे सहन करता येतं ते सहन करायलाच हवंय. थ्युसीडिडीजने मांडलेला हा तर्क आजही अपरिहार्य असल्यासारखा मांडला जातो, जणू आंतरराष्ट्रीय संबंधांची नैसर्गिक तर्कशुद्धता पुन्हा स्वतःला आश्वस्त करत आहे. या तर्काला सामोरे ठेवत आज अनेक देशांमध्ये अशी प्रवृत्ती दिसते की विद्यमान परिस्थितीशी जुळवून घ्यावं, महासत्तांशी तडजोड करावी, त्यांच्या आज्ञा पाळल्या की त्रास टळेल आणि आपल्याला सुरक्षितता मिळेल.

पण तसे होणार नाही.
मग आपले पर्याय कोणते आहेत?

१९७८ मध्ये, चेक प्रजासत्ताकातील असंतुष्ट विचारवंत आणि पुढे राष्ट्राध्यक्ष बनलेले व्हॅक्लाव हावेल यांनी ‘द पॉवर ऑफ द पॉवरलेस’ हा निबंध लिहिला. त्यात त्यांनी एक सोपा प्रश्न विचारला; साम्यवादी व्यवस्था स्वतःला कशी टिकवून ठेवत होती?

त्यांचे उत्तर एका भाजीवाल्यापासून सुरू होते.
दररोज सकाळी हा दुकानदार आपल्या दुकानाच्या खिडकीत एक फलक लावतो: “जगातील कामगारांनो, एकत्र या.” त्याला स्वतःला त्यावर विश्वास नसतो, इतर कोणालाही नसतो; तरीही तो फलक लावतो—त्रास टाळण्यासाठी, आज्ञाधारकपणा दाखवण्यासाठी, आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी. आणि प्रत्येक रस्त्यावरचा प्रत्येक दुकानदार असेच करत असल्यामुळे ही व्यवस्था टिकून राहते—फक्त हिंसेच्या बळावर नव्हे, तर सामान्य लोक खोटे असल्याचे माहीत असतानाही ज्या कार्यामध्ये सहभागी होतात त्यामधून.

हावेल यांनी याला ‘खोट्यात जगणे’ असे नाव दिले.
व्यवस्थेची ताकद तिच्या सत्यातून येत नाही, तर ती सत्य असल्यासारखे वागण्याची सर्वांची तयारी यातून येते आणि तिची नाजूकता देखील याच ठिकाणाहून निर्माण होते. जेव्हा एखादाच माणूस हे नाटक करणे थांबवतो, जेव्हा भाजीवाला तो फलक काढून टाकतो, तेव्हा भ्रमाला तडे जाऊ लागतात. मित्रांनो, आता कंपन्या आणि देशांनीही आपले फलक खाली काढण्याची वेळ आली आहे.

अनेक दशकांपर्यंत कॅनडासारखे देश आपण ‘नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था’ म्हणत असलेल्या चौकटीत भरभराटीस आले. आम्ही तिच्या संस्थांमध्ये सहभागी झालो, तिच्या तत्त्वांचे कौतुक केले आणि तिच्या स्थैर्याचा लाभ घेतला. त्यामुळेच तिच्या छत्राखाली मूल्याधिष्ठित परराष्ट्र धोरणे राबवू शकलो. आम्हाला माहीत होते की ही नियमाधिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यवस्था अंशतः खोटी आहे—सर्वात बलवान देश सोयीस्कर वेळी स्वतःसाठी नियम शिथिल करतात, व्यापारनियम असमतोलाने अंमलात आणले जातात, आणि आंतरराष्ट्रीय कायदे आरोपी किंवा पीडित कोण आहे यावर अवलंबून वेगवेगळ्या कडकपणाने लागू होतात. तरीही हा भ्रम उपयुक्त होता. विशेषतः अमेरिकेच्या वर्चस्वामुळे सार्वजनिक हित-साधने, खुले सागरी मार्ग, स्थिर आर्थिक व्यवस्था, सामूहिक सुरक्षा आणि वाद निवारणासाठी चौकटी उपलब्ध होत होत्या. म्हणूनच आम्ही खिडकीत फलक लावला. आम्ही त्या कामांमध्ये सहभागी झालो आणि घोषणांमधील व वास्तवातील दरीकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले.

पण आता हा करार चालत नाही.
मी स्पष्टपणे सांगतो—आपण संक्रमणाच्या टप्प्यात नाही, तर एका मोठ्या व्यत्ययाच्या  मध्यभागी आहोत.

गेल्या दोन दशकांत वित्त, आरोग्य, ऊर्जा आणि भू-राजकारणातील संकटांच्या मालिकेने जागतिक एकात्मतेतील जोखमी स्पष्टपणे उघड केल्या आहेत. मात्र अलीकडे महासत्तांनी आर्थिक एकात्मतेलाच शस्त्र म्हणून वापरायला सुरुवात केली आहे, शुल्कांना दबावाचे साधन बनवले आहे, वित्तीय पायाभूत रचनेचा सक्तीच्या साधनासारखा वापर केला आहे, आणि पुरवठा साखळ्यांतील कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

जेव्हा एकात्मताच अधीनतेचे कारण बनते, तेव्हा परस्पर फायद्याच्या एकात्मतेच्या भ्रमात जगणे शक्य राहत नाही.

ज्या बहुपक्षीय संस्थांवर मध्यम शक्ती असलेले देश अवलंबून होते, जसे की डब्ल्यूटीओ, संयुक्त राष्ट्रसंघ, सीओपी, त्या संस्थाच नव्हे तर सामूहिक समस्यांचे निराकरण करण्याची संपूर्ण रचनाच आज धोक्यात आली आहे. परिणामी, अनेक देश असा निष्कर्ष काढत आहेत की त्यांना ऊर्जा, अन्न, महत्त्वपूर्ण खनिजे, वित्त आणि पुरवठा साखळ्या यांमध्ये अधिक धोरणात्मक स्वायत्तता विकसित करावी लागेल.

हा कल समजण्याजोगा आहे. जो देश स्वतःचे अन्न पिकवू शकत नाही, स्वतःला ऊर्जा पुरवू शकत नाही किंवा स्वतःचे संरक्षण करू शकत नाही, त्याच्याकडे फारसे पर्याय उरत नाहीत. जेव्हा नियम तुमचे संरक्षण करत नाहीत, तेव्हा तुम्हालाच स्वतःचे संरक्षण करावे लागते. पण हे कुठे नेऊन ठेवेल, याबाबत आपण स्पष्ट दृष्टी ठेवली पाहिजे.
किल्ल्यांनी वेढलेले जग अधिक गरीब, अधिक नाजूक आणि कमी शाश्वत असेल. आणि एक आणखी कटू सत्य असे आहे की, जर महासत्तांनी आपल्या सत्तेचा व हितसंबंधांचा निर्बंधाविना पाठपुरावा करण्यासाठी नियम आणि मूल्यांचा केवळ देखावाही सोडून दिला, तर व्यवहारप्रधान राजकारणातून मिळणारे लाभ पुन्हा पुन्हा साध्य करणे अधिक कठीण होईल. प्रबळ सत्ताधारी आपले संबंध सातत्याने नफ्यात रूपांतरित करू शकत नाहीत.
मित्रदेश अनिश्चिततेपासून बचावासाठी आपले अनेक पर्याय निवडतील. ते सुरक्षिततेसाठी ‘विमा’ घेतील, अधिक पर्याय निर्माण करतील आणि आपले सार्वभौमत्व पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करतील; जे कधीकाळी नियमांवर आधारलेले होते, पण पुढे अधिकाधिक दबाव सहन करण्याच्या क्षमतेवर आधारित असेल.

या सभागृहातील सर्वांना माहीत आहे की हे पारंपारिक जोखीम व्यवस्थापन आहे. जोखीम व्यवस्थापनाला किंमत असते; पण धोरणात्मक स्वायत्ततेची आणि सार्वभौमत्वाची ही किंमत एकट्यानेच उचलावी लागते असे नाही—ती सामायिकही करता येते. लवचिकता वाढवण्यासाठी केलेली सामूहिक गुंतवणूक प्रत्येकाने आपापले किल्ले उभारण्यापेक्षा स्वस्त पडते. सामायिक मानके विघटन कमी करतात. परस्परपूरकता ही सर्वांसाठी लाभदायक असते. म्हणून कॅनडासारख्या मध्यम शक्ती असलेल्या देशांसमोरचा प्रश्न हा नाही की आपण या नव्या वास्तवाशी जुळवून घ्यायचे की नाही—ते आपल्याला करायलाच लागेल. खरा प्रश्न असा आहे की आपण हे फक्त अधिक उंच भिंती बांधून करणार आहोत, की त्यापेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी काहीतरी करू शकतो?

आता कॅनडा हा इशारा सर्वप्रथम ओळखणाऱ्या देशांपैकी एक होता, आणि त्यामुळे आम्ही आमची धोरणात्मक भूमिका मूलभूतपणे बदलण्यास सुरुवात केली. कॅनडियन लोकांना हे माहीत आहे की आपल्या भौगोलिक स्थानामुळे आणि आघाड्यांमधील सदस्यत्वामुळे आपोआपच समृद्धी आणि सुरक्षितता मिळते. ही जुनी, आरामदायी समजूत आता ग्राह्य राहिलेली नाही. आमचा नवा दृष्टिकोन फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब्ब यांनी ज्याला “मूल्याधारित वास्तववाद” असे संबोधले आहे, त्यावर आधारलेला आहे.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आम्ही तत्त्वनिष्ठही आहोत आणि व्यवहार्यही—मूलभूत मूल्यांप्रती, सार्वभौमत्वाप्रती, प्रादेशिक अखंडतेप्रती, संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसारच बळाचा वापर करण्याच्या तत्त्वाप्रती आणि मानवाधिकारांच्या आदराप्रती आम्ही ठाम आहोत; तसेच आम्ही हेही वास्तववादीपणे मान्य करतो की प्रगती अनेकदा टप्प्याटप्प्याने होते, हितसंबंध वेगवेगळे असतात आणि प्रत्येक भागीदार आमची सर्व मूल्ये सामायिक करेलच असे नाही.

म्हणूनच आम्ही डोळे उघडे ठेवून व्यापक आणि धोरणात्मक पातळीवर संवाद साधत आहोत. आम्ही जग जसे आहे तसे सक्रियपणे सामोरे जातो—आम्हाला हवे आहे तसे जग होईपर्यंत थांबत बसत नाही. आमचे संबंध आम्ही काळजीपूर्वक संतुलित करत आहोत, जेणेकरून त्यांची खोली आमच्या मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल. तसेच, सध्याच्या बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या जोखमी आणि पुढे काय घडेल याचे महत्त्व लक्षात घेऊन, आमचा प्रभाव वाढवण्यासाठी व्यापक सहभागाला आम्ही प्राधान्य देत आहोत. आता आम्ही फक्त आमच्या मूल्यांच्या बळावर विसंबून राहात नाही, तर आमच्या बळाच्या मूल्यालाही महत्त्व देत आहोत. आणि हे बळ आम्ही देशांतर्गत पातळीवर उभारत आहोत.

आम्ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट करत आहोत. जागतिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही चल – रचनात्मकता (variable geometry) स्वीकारत आहोत—म्हणजे समान मूल्ये आणि हितसंबंधांवर आधारित, वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी वेगवेगळ्या आघाड्या उभ्या करणे. त्यामुळे युक्रेनच्या बाबतीत आम्ही कोअ‍ॅलिशन ऑफ द विलिंगचे प्रमुख सदस्य आहोत आणि त्याच्या संरक्षण व सुरक्षिततेसाठी प्रति व्यक्ती सर्वाधिक योगदान देणाऱ्या देशांपैकी एक आहोत. आर्क्टिक सार्वभौमत्वाच्या प्रश्नावर आम्ही ग्रीनलंड आणि डेन्मार्कसोबत ठामपणे उभे आहोत आणि ग्रीनलंडच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा त्यांचा विशेष अधिकार पूर्णपणे समर्थित करतो. ग्रीनलंडच्या मुद्द्यावर लादल्या जाणाऱ्या शुल्कांना कॅनडा ठाम विरोध करतो आणि आर्क्टिकमधील सुरक्षा व समृद्धी ही आपली सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केंद्रित संवादाचे आवाहन करतो.

बहुपक्षीय (plurilateral) व्यापाराच्या संदर्भात, ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप आणि युरोपियन युनियन यांच्यात दुवा निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे आम्ही नेतृत्व करत आहोत. यामुळे सुमारे १.५ अब्ज लोकसंख्येचा नवा व्यापार गट उभा राहू शकतो. अत्यावश्यक खनिजांच्या बाबतीत, पुरवठा काही मोजक्या ठिकाणी केंद्रीत राहू नये म्हणून आम्ही G7च्या आधारावर खरेदीदारांचे गट (buyers’ clubs) तयार करत आहोत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात, समान विचारांच्या लोकशाही देशांशी सहकार्य करत आहोत, जेणेकरून भविष्यात आपल्याला महासत्ता आणि अतिविशाल तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एकाची सक्तीने निवड करावी लागू नये.

हा भोळा बहुपक्षीयतावाद नाही, तसेच केवळ विद्यमान संस्थांवर अवलंबून राहणेही नाही. हा एक प्रयत्न आहे,  मुद्द्यानुसार प्रत्यक्ष काम करणाऱ्या आघाड्या उभ्या करण्याचा प्रयत्न आहे—अशा भागीदारांसोबत, ज्यांच्यात एकत्र कृती करण्याइतकी समानता आहे. काही प्रसंगी यात जगातील बहुतांश देश सहभागी असतील. यातून व्यापार, गुंतवणूक आणि संस्कृती यांमधील परस्परसंबंधांचे एक दाट जाळे तयार होत आहे, ज्याचा उपयोग आपण भविष्यातील आव्हाने आणि संधींसाठी करू शकतो.

जर आपण चर्चेच्या टेबलावर नसू, तर आपणच मेनूवर असतो

माझा ठाम युक्तिवाद असा आहे की मध्यम शक्ती असलेल्या देशांनी एकत्र कृती केली पाहिजे; कारण आपण चर्चेच्या टेबलावर नसू, तर आपणच मेनूवर असतो. मात्र हेही खरे आहे की महासत्तांना—किमान सध्या तरी—एकट्याने पुढे जाणे परवडते. त्यांच्याकडे मोठी बाजारपेठ, लष्करी क्षमता आणि अटी लादण्याची ताकद आहे. मध्यम शक्तींच्या देशांकडे ती क्षमता नसते. परंतु जेव्हा आपण एखाद्या महासत्तेशी केवळ द्विपक्षीय वाटाघाटी करतो, तेव्हा त्या वाटाघाटी कमजोरीच्या स्थितीतून होतात. जे दिले जाते ते आपण स्वीकारतो. अधिक “समंजस” ठरण्यासाठी आपण एकमेकांशी स्पर्धा करतो. ही सार्वभौमता नाही. ही अधीनता स्वीकारून सार्वभौमतेचे केवळ नाटक करणे आहे. महासत्तांमधील स्पर्धेच्या जगात, मधल्या देशांसमोर एक पर्याय असतो—एकमेकांशी कृपादृष्टी मिळवण्यासाठी स्पर्धा करणे, किंवा एकत्र येऊन प्रभावी असा तिसरा मार्ग निर्माण करणे.

कठोर शक्तीच्या (hard power) उदयामुळे आपण वैधता, प्रामाणिकपणा आणि नियम यांच्या शक्तीकडे दुर्लक्ष करू नये. आपण जर त्या शक्ती एकत्र वापरायचा निर्णय घेतला, तर त्या अजूनही प्रभावी राहतील—आणि याच ठिकाणी मी पुन्हा व्हॅक्लाव हावेलकडे येतो. मध्यम शक्ती असलेल्या देशांनी “सत्यात जगणे” याचा अर्थ काय?

प्रथम, याचा अर्थ वास्तवाला नाव देणे. नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था अजूनही जशी सांगितली जाते तशी कार्यरत आहे, असे म्हणणे थांबवले पाहिजे. तिला तिच्या खऱ्या स्वरूपात ओळखले पाहिजे—महासत्तांमधील वाढती स्पर्धा असलेली व्यवस्था, जिथे सर्वात शक्तिशाली देश आर्थिक एकीकरणाचा वापर दबाव टाकण्यासाठी करतात. याचा अर्थ सातत्याने कृती करणे—मित्र आणि प्रतिस्पर्धी यांना समान निकष लावणे. जेव्हा मध्यम शक्ती एका बाजूकडून होणाऱ्या आर्थिक दबावावर टीका करतात, पण दुसऱ्या बाजूकडून तोच दबाव आल्यावर गप्प राहतात, तेव्हा आपण अजूनही खिडकीत तो फलक लावून ठेवलेला असतो.

याचा अर्थ जुनी व्यवस्था परत येईल याची वाट पाहत बसण्याऐवजी आपण ज्या गोष्टींवर विश्वास असल्याचे सांगतो, त्या प्रत्यक्ष उभ्या करणे. संस्था आणि करार असे निर्माण करणे जे जसे सांगितले जातात तसे प्रत्यक्षात काम करतात. तसेच दबाव टाकण्यास सक्षम करणारे अवलंबित्व कमी करणे, म्हणजेच देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत करणे. हे प्रत्येक सरकारचे तातडीचे प्राधान्य असले पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविधीकरण (diversification) केवळ आर्थिक शहाणपण नाही; ते प्रामाणिक परराष्ट्र धोरणाचा भौतिक पाया आहे. कारण जे देश प्रतिहल्ल्याच्या भीतीपासून स्वतःला सुरक्षित करतात, तेच तत्त्वनिष्ठ भूमिका घेण्याचा नैतिक अधिकार मिळवतात.

कॅनडा ही एक बहुविध, समावेशक आणि यशस्वी समाजरचना आहे. आमचे सार्वजनिक क्षेत्र विविधतेने व  वेगवेगळ्या आवाजाने भरलेले आणि मुक्त आहे. कॅनेडियन लोक शाश्वततेसाठी कटिबद्ध आहेत. आजच्या अस्थिर जगात कॅनडा हा एक स्थिर आणि विश्वासार्ह भागीदार आहे—दीर्घकाळ टिकणाऱ्या नातेसंबंधांना महत्त्व देणारा आणि ते जपणारा भागीदार. आमच्याकडे आणखी एक गोष्ट आहे, घडत असलेल्या वास्तवाची जाणीव आणि त्यानुसार कृती करण्याचा ठाम निर्धार. आम्हाला समजते की हा व्यत्यय केवळ जुळवून घेण्याची मागणी करत नाही; तो जग जसे आहे तसे प्रामाणिकपणे स्वीकारण्याची मागणी करतो.

आम्ही खिडकीतला तो फलक काढून टाकत आहोत. जुनी व्यवस्था परत येणार नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. तिचा शोक करण्याची गरज नाही. आठवणींमध्ये रमणे ही रणनीती नाही. पण आम्हाला विश्वास आहे की या आपत्ती मधून आपण काहीतरी अधिक मोठे, अधिक चांगले, अधिक मजबूत आणि अधिक न्याय्य उभारू शकतो. हेच मध्यम शक्ती असलेल्या देशांचे कार्य आहे; ज्यांना “किल्ल्यांच्या जगात” सर्वाधिक तोटा होऊ शकतो आणि खरी सहकार्याची संधी मिळाल्यास सर्वाधिक फायदा होऊ शकतो. शक्तिशाली देशांकडे त्यांची शक्ती आहे. पण आमच्याकडेही काहीतरी आहे, भासवणे थांबवण्याची क्षमता, वास्तवाला नाव देण्याचे धैर्य, देशांतर्गत ताकद उभारण्याची तयारी आणि एकत्र कृती करण्याची इच्छाशक्ती.

हा कॅनडाचा मार्ग आहे. आम्ही तो उघडपणे आणि आत्मविश्वासाने निवडला आहे. आणि हा मार्ग कोणत्याही अशा देशासाठी खुला आहे, जो आमच्यासोबत त्या मार्गावर चालण्यास तयार आहे.
धन्यवाद.

https://www.weforum.org/stories/2026/01/davos-2026-special-address-by-mark-carney-prime-minister-of-canada/

अनुवाद: मीनल उत्तुरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *