गांधी आणि मार्क्स हे आजच्या काळासाठी अत्यंत घडवणारे, प्रभावी आणि अंतर्दृष्टीपूर्ण विचारवंत व कृतीशील व्यक्ती आहेत, हे मान्य करत असतानाच, हा निबंध एका मूलभूत प्रश्नाने प्रेरित आहे : २०२५ मध्ये गांधी आणि गांधीवादी दृष्टिकोनांत काय जिवंत आहे आणि काय मृत आहे? तसेच मार्क्स आणि मार्क्सवादी दृष्टिकोनांत काय जिवंत आहे आणि काय मृत आहे? कार्ल मार्क्स यांचा जन्म १८१८ मध्ये जर्मनीतील ट्रिअर येथे झाला आणि १८८३ मध्ये लंडन येथे त्यांचे निधन झाले. मोहनदास करमचंद (महात्मा) गांधी यांचा जन्म १८६९ मध्ये भारतातील पोरबंदर येथे झाला, म्हणजेच मार्क्स यांच्या निधनाच्या १४ वर्षे आधी. गांधींच्या आयुष्यात भारतात मार्क्सचा महत्त्वपूर्ण प्रभाव होता आणि तो प्रभाव ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली येथे गांधींच्या हत्येपर्यंत कायम राहिला. मार्क्स आणि गांधी हे आधुनिक जग समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये गणले जातात. हा निबंध त्यांना द्वंद्वात्मक संबंधांत कसे आणता येईल—ज्यायोगे नवे सर्जनशील आकलन आणि व्यवहार घडू शकतात—याचा शोध घेतो. अनेक दशकांच्या अनुभवांमधून, अभ्यासातून आणि समजुतीतून मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की एम. के. गांधी यांना अनेकदा अतिमानवी महात्मा म्हणून पूजले गेले आहे आणि आजही त्यांची तशीच स्तुती केली जाते. त्यांच्या लेखनाला अनेकदा मतवादी, धर्मग्रंथासारखे स्थान दिले जाते. परस्परविरोधी गांधीवादी आणि गांधीविरोधी दृष्टिकोन व भूमिका गटबाजीमध्ये अडकून कठोर व जड झाल्या आहेत. यामुळे आजच्या काळातील गांधी आणि गांधीवादी प्रवृत्तींमधील जिवंतपणा नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. त्याचप्रमाणे, माझा निष्कर्ष असा आहे की कार्ल मार्क्स यांनाही अनेकदा द्वंद्वात्मकतेशिवाय एका मतवादी चौकटीत उंचस्थानी बसवले गेले आहे. विविध मार्क्सवादी त्यांच्या लेखनाला सर्व आवश्यक उत्तरे व उपाय देणारे मूलभूत, अंतिम ग्रंथ म्हणून स्वीकारतात. परस्परविरोधी मार्क्सवादी आणि मार्क्सविरोधी दृष्टिकोन व भूमिका गटबाजीमध्ये अडकून जड आणि स्थिर झाल्या आहेत. पुन्हा एकदा, यामुळे आजच्या काळातील मार्क्स आणि मार्क्सवादी प्रवृत्तींमधील जिवंतपणा नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. मार्क्स यांना शेकडो दशलक्ष लोकांनी स्वीकारले आहे आणि असंख्य, परस्परांशी अनेकदा विसंगत अशा मार्क्सवादी व समाजवादी गटांनी आणि दृष्टिकोनांनी त्यांना आत्मसात केले आहे. यामुळे हे वास्तव नाकारले जात नाही की मार्क्स यांना अनेकदा आधुनिक काळातील सर्वात द्वेषित आणि धोकादायक व्यक्ती म्हणूनही सादर केले जाते. उदाहरणार्थ, मार्क्स आणि एंगेल्स यांनी झटपट तयार केलेला ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’—जो एक लघु जाहीरनामा असावा, दीर्घ, काटेकोर शास्त्रीय ग्रंथ नव्हे—याला आधुनिक काळातील सर्वाधिक टीकेला सामोरे गेलेला राजकीय मजकूर असे वर्णन केले गेले आहे; आणि त्याच वेळी, जागतिक पातळीवर तो कदाचित सर्वांत प्रेरणादायी, गौरवलेला आणि प्रभावशाली आधुनिक राजकीय लेखनांपैकी एक ठरला आहे. आता एम. के. गांधींकडे वळल्यास, माझ्या तरुणपणी त्यांच्याविषयीची प्रतिमा मार्क्सपेक्षा खूपच वेगळी होती. तरुणपणी आम्ही गांधींचे लेखन वाचले किंवा त्यांचा अभ्यास केला नव्हता; मात्र महात्मा गांधी यांची प्रसिद्ध छायाचित्रे, घोषणा आणि संदर्भ सर्वत्र होते. हे संदर्भ प्रामुख्याने सकारात्मक, कधी कधी भक्तिभावाने परिपूर्ण असत, जरी काही वेळा धोतर परिधान केलेल्या संतसदृश व्यक्तीची प्रतिमा थोडी विचित्रही वाटत असे. खरे तर, महात्मा गांधी यांना भारतातच नव्हे तर जगातही सर्वाधिक प्रशंसित नैतिक, राजकीय आणि आध्यात्मिक व्यक्ती म्हणून अनेकदा सादर केले जात असे. उदाहरणार्थ, कट्टर समाजवादी असलेले अल्बर्ट आईनस्टाइन यांनी गांधींबद्दल प्रसिद्धपणे असे म्हटले होते की भविष्यातील पिढ्यांना असा एखादा हाडा मांसाचा व्यक्ती खरोखर या पृथ्वीवर चालून गेला होता, यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. आईनस्टाइन यांनी असेही सांगितले की गांधींचे राजकीय विचार अत्यंत प्रबुद्ध होते आणि आपण गांधींच्या आत्म्यातून कृती करायला हवी—हिंसा न वापरता आणि वाईटात सहभागी न होता. २०२५ मध्येही गांधींना सामान्यतः अहिंसेचे जगातील सर्वात महान प्रवर्तक म्हणून गौरवले जाते. गांधींचा जन्मदिन, २ ऑक्टोबर, संयुक्त राष्ट्रसंघाकडून योग्यच ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजही गांधींना भविष्यातील जगासाठी सर्वाधिक आदरणीय नैतिक व आध्यात्मिक व्यक्ती म्हणून अनेकदा मांडले जाते. गांधींचा अधिक भर आणि सामर्थ्य : हिंसा व अहिंसा महात्मा गांधींची दोन मूलभूत तत्त्वे म्हणजे सत्य (जे खरे व वास्तव आहे) आणि अहिंसा (कोणतीही हानी न करणे). आधुनिक काळातील अहिंसेचे सर्वात प्रभावी प्रवर्तक म्हणून गांधी ओळखले जातात. गांधींच्या हिंसा-अहिंसेविषयीच्या विचारांमुळे मार्क्सच्या दृष्टिकोनाला अधिक व्यापक व सखोल करता येते आणि दोघांमध्ये अर्थपूर्ण द्वंद्वात्मक नाते उलगडते. मार्क्स यांना अनेकदा चुकीच्या पद्धतीने अतिहिंसक म्हणून मांडले जाते, तर गांधींना पूर्णतः अहिंसक म्हणून. प्रत्यक्षात मार्क्स हिंसेचे अंध समर्थन करत नाहीत. भांडवलशाही सत्ताधारी वर्ग स्वेच्छेने सत्ता सोडणार नाही, म्हणून संक्रमणकाळात हिंसा अपरिहार्य ठरते, असे त्यांचे मत आहे; मात्र अंतिम टप्प्यात ते “राज्याच्या लयाला जाण्याची” आणि तुलनेने अहिंसक साम्यवादाची कल्पना मांडतात, जी गांधींच्या आदर्शाशी जवळची आहे. विशेष म्हणजे, गांधीसुद्धा अनेक ठिकाणी मान्य करतात की काही प्रसंगी हिंसा अपरिहार्य ठरू शकते, जरी ती दुःखद असली तरी. फरक इतकाच की गांधी मार्क्सवर हिंसेला जास्त महत्त्व दिल्याचा आरोप करतात, तर मार्क्स गांधींवर वर्गसंघर्षातील हिंसेची गरज कमी लेखल्याचा आरोप करतात. हिंसा व अहिंसेचे विश्लेषण गांधींनी मार्क्सपेक्षा अधिक सखोल केले आहे. गांधी आपल्याला दाखवतात की अहिंसा फक्त शारीरिक हिंसेचा अभाव नसून ती बहुआयामी आहे. उघड शारीरिक हिंसेबरोबरच मानसिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय हिंसाही अस्तित्वात असते. गांधी विशेषतः संरचनात्मक हिंसेवर भर देतात—जी प्रचलित आर्थिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थांमध्ये लपलेली असते आणि आपल्याला ती हिंसा वाटतही नाही. या व्यवस्थाच शोषण, अन्याय आणि दडपशाही टिकवून ठेवतात. थोडक्यात सांगायचे तर, बहुआयामी व संरचनात्मक हिंसा ओळखण्यात अनेकदा अपयशी ठरलेल्या मार्क्सवादी परंपरेला गांधींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मार्क्सचा अधिक भर आणि सामर्थ्य : भांडवलशाही, वर्गसंबंध आणि वर्गसंघर्ष गांधींपेक्षा ज्या बाबतीत मार्क्स अधिक विकसित वाटतात, त्या संदर्भात सांगायचे तर कार्ल मार्क्स यांनी उत्पादनपद्धतीवर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शोषक व अन्यायकारक वर्गसंबंधांवर अधिक सखोल, काटेकोर आणि चिकित्सक विश्लेषण केले आहे. वस्तूकरण, वस्तूपूजा, माणसाचे अमानवीकरण करणारी व्यवस्था (alienation), अतिरिक्त मूल्याची निर्मिती आणि भांडवलाची अखंड वाढ व विस्तार यांचे त्यांनी खोलवर स्पष्टीकरण केले आहे. भांडवलशाहीपलीकडे जाऊन वर्गविरहित, समृद्ध समाज घडवताना येणाऱ्या अडथळ्यांचेही त्यांनी नेमके विश्लेषण केले आहे—जिथे “प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार” हा तत्त्वाधार असतो आणि जिथे प्रत्येकाचे कल्याण हे सर्वांच्या कल्याणाशी द्वंद्वात्मकरीत्या जोडलेले असते. अनेकांना आश्चर्य वाटेल, पण गांधी प्रत्यक्षात या मार्क्सवादी भूमिकेशी मोठ्या प्रमाणावर सहमत होते. गांधी वारंवार सांगतात की भांडवलशाही ही मूलतः शोषक, हिंसक व अन्यायकारक आहे आणि ते स्वतः समाजवादी आहेत. काही ठिकाणी त्यांनी मार्क्सच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे आणि कधी कधी बोल्शेविक साम्यवादाच्या आदर्शालाही अनुमोदन दिले आहे. त्यांच्या मते, मार्क्सचा साम्यवादी आदर्श आणि त्यांचा स्वतःचा आदर्श—लोभ, मालकीभाव, खाजगी मालमत्ता, असमान वर्गसंबंध आणि प्रभुत्व यांपलीकडे जाऊन मानव, निसर्ग व विश्वाशी सुसंवादी नाते असलेल्या वर्गविरहित समाजाचा—यांत फारसा फरक नाही. तथापि, भांडवलशाही आणि वर्गसंबंधांच्या बाबतीत मार्क्स जिथे अधिक काटेकोर व स्पष्ट आहेत, तिथे गांधींचे विचार व आचरण काही वेळा अस्पष्ट, अविचारी व अपुरे वाटतात. उदाहरणार्थ, गांधी असे म्हणतात की भांडवलाला कामगारांची गरज आहे आणि कामगारांनाही भांडवलाची गरज आहे. भांडवलशाही ही ऐतिहासिक आणि बदलणारी रचना आहे, असे मार्क्स स्पष्ट करतात; मात्र गांधी कधी कधी भांडवल व भांडवलशाही ही कायमस्वरूपी व अपरिहार्य आहेत, असा विरोधाभासी संकेत देतात, जो त्यांच्या इतर विचारांशी विसंगत ठरतो. हिंसा-अहिंसेच्या संदर्भातही ही मर्यादा दिसते. गांधींचा आग्रह असा आहे की अहिंसेच्या मार्गाने मोठे भांडवलदार, उच्चवर्णीय आणि सत्ताधारी गट यांचे मन परिवर्तन करून कायमस्वरूपी बदल घडवता येईल. मार्क्सच्या दृष्टीने ही भूमिका भोळी किंवा विद्यमान शोषक व्यवस्थेशी अप्रत्यक्षपणे जुळवून घेणारी आहे. यामुळेच, अनेक भांडवलदार गांधींना धोका मानत नव्हते, तर मार्क्सला मात्र क्रांतिकारी धोका म्हणून पाहत होते. अखेरीस, गांधी आणि मार्क्स यांच्यातील द्वंद्वात्मक नात्याचे इतरही अनेक पैलू आहेत—उदा. नीतिशास्त्र, अहंकार व आत्मस्वरूप, तसेच सत्य व वास्तवाकडे पाहण्याची सेंद्रिय व परस्परसंबंधित दृष्टी. हे सर्व पैलू गांधींच्या अहिंसेवरील भराशी आणि मार्क्सच्या भांडवलशाही व वर्गसंघर्षावरील सखोल विश्लेषणाशी घट्टपणे जोडलेले आहेत. गांधींच्या साधन–साध्य तत्त्वानुसार, कितीही चांगले उद्दिष्ट असले तरी ते साध्य करण्यासाठी अनैतिक, असत्य, हिंसक किंवा अन्यायकारक मार्ग वापरता येत नाहीत. साधने आणि साध्ये ही परस्परावलंबी असून दोन्हीही शक्य तितकी शुद्ध, नैतिक आणि आध्यात्मिक असली पाहिजेत. थोडक्यात, नैतिक शिक्षणातून घडणारा नैतिक विकास हा सत्य, अहिंसा आणि वास्तवाच्या आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक आहे. कार्ल मार्क्स हे गांधींसारखे मुख्यतः नीतिचिंतक नसले, तरी ‘१८४४ चे आर्थिक व तत्त्वज्ञानविषयक हस्तलिखित’ आणि त्यांचे इतर लेखन खोल नैतिक मानवतावाद व्यक्त करते. हे युगोस्लाव्हियातील ‘प्रॅक्सिस’ मार्क्सवादी, एरिक फ्रॉम व इतर मानवतावादी मार्क्सवाद्यांनी अधोरेखित केले आहे. मार्क्स व गांधी दोघेही आधुनिक विचारसरणीतील स्वतंत्र, अहंकारप्रधान व्यक्तीची संकल्पना; मूल्यनिरपेक्ष विज्ञान व तंत्रज्ञानाची कल्पना; तसेच तटस्थ, अपरिवर्तित तथ्ये किंवा माहिती यांचा चिकित्सकपणे निषेध करतात. त्यांच्या मते, कोणतेही विशिष्ट घटक स्वतंत्रपणे समजून घेता येत नाहीत; ते ज्या व्यापक ऐतिहासिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय रचनांचा भाग असतात, त्यांच्याशी द्वंद्वात्मक पद्धतीने जोडलेले असतात. उदाहरणार्थ, मार्क्स आधुनिक तंत्रज्ञानाकडे तटस्थ साधन म्हणून पाहण्यास नकार देतात. ते तंत्रज्ञानाला भांडवलशाही उत्पादनपद्धतीत रुजलेले आणि त्या शोषक संबंधांचे प्रतिबिंब मानतात. भांडवलशाहीपलीकडील समाजात तंत्रज्ञानाचे स्वरूप व कार्यगुणधर्म मुळातच वेगळे असतील, असे ते स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे, गांधी आधुनिक सभ्यतेतील तंत्रज्ञानाकडे ‘यंत्रवेड’ म्हणून पाहतात—जे मानव व निसर्गावर प्रभुत्व मिळवण्याचे, संपत्ती व सत्तासंचयाचे साधन बनते. याच्या विरोधात गांधी तंत्रज्ञानाला मानवी संबंध, निसर्ग, सत्य व वास्तव यांच्याशी सुसंवादी व शाश्वत नात्याचे एक साधन म्हणून पाहण्याचे आव्हान देतात. मार्क्स आणि गांधी दोघांच्याही मते, जेव्हा संपूर्णता आणि तिचे घटक परस्पर जोडले जातात, तेव्हा केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मकदृष्ट्याही काहीतरी नवे उलगडते—जे स्वतंत्र घटकांत किंवा त्यांच्या बेरीजेतही सापडत नाही. हा धडा मार्क्सवादी व गांधीवादी दृष्टिकोनांना त्यांच्या भूतकाळातील व वर्तमानातील मर्यादा ओळखण्यासाठी महत्त्वाचा आहे. (डग्लस ऍलेन हे अमेरिकेतली यूनिवर्सिटी ऑफ मेन (University of Maine) मध्ये फिलोसॉफी डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर एमेरिटस ऑफ फिलोसॉफी आहेत.) अनुवाद: मीनल उत्तुरकर Post navigation पर्यावरणकेंद्री विकासाचा पुरस्कर्ता मानवतावादी शास्त्रज्ञ माधव गाडगीळ राष्ट्रपित्याच्या बलिदानाची ७८ वर्षे